
नाशिक, दि. 29 – रामायण काळापासून प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीच्या ओझर येथील विमानतळाला “जटायू विमानतळ, नाशिक” असे अधिकृत नामकरण करावे, अशी मागणी विरक्त साधू समाज नासिक मंडळ नासिक ट्रस्ट आणि श्री क्षेत्र नासिक आद्य संत महंत मंडळ नाशिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री, विमान मंत्रालय यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखो भाविक, साधू-संत, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत.

अशा वेळी विमानतळाचे नाव “जटायू विमानतळ, नाशिक” असे असल्यास नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मनात “जटायू कोण होते? आणि त्यांचा नाशिकशी काय संबंध आहे?” हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होईल.
या एका नावातूनच रामायणातील जटायू महाराजांचा त्याग, शौर्य आणि माता सीतेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले बलिदान याची माहिती जगभर पोहोचेल. तसेच नाशिक जिल्ह्यातील टाकेद येथील जटायू मंदिर आणि त्याच्याशी संबंधित धार्मिक वारशाकडेही देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल.

यामुळे विमानतळाचे नामकरण हे केवळ नाव बदलणे न राहता नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणारे आणि भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणारे माध्यम ठरेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणारे साधू संत, महंत आणि देशभरातील रामभक्त या निर्णयाचे निश्चितच स्वागत करतील.
ही मागणी अचानक नाही.. ओझर विमानतळ अस्तित्वात आले, विमानसेवा सुरू झाली; परंतु या विमानतळाला अद्याप नाशिकच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडणारे नाव मिळाले नाही. या पूर्वीही साधू-संतांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच ही मागणी अचानक निर्माण झालेली नसून, धार्मिक व संत परंपरेतून यापूर्वी पुढे आलेली मागणी आहे. आता २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मागणीला शासनाने सकारात्मक निर्णयाद्वारे मूर्त रूप द्यावे, ही अत्यंत योग्य वेळ आहे.
नाशिक ही कुंभनगरी, मंत्रनगरी आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाशीही या भूमीचे नाते आहे. अशा समृद्ध धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहराच्या विमानतळाला “जटायू” हे नाव देणे नाशिकच्या अस्मितेला साजेसे ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. महंत भक्ती चरणदास जी महाराज, महंत श्री नरसिंह कृपादास महाराज, छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विलास पांगारकर, वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे, धनंजय बेळे, आध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील वलवे, नरहरी उगलमुगले, पत्रकार अमोल सोनवणे, हेमंत काळमेख, सप्तशृंगी गड कोजागिरी पौर्णिमा उत्सव समिती अध्यक्ष अर्जुन काळे, अतुल पांगारकर, बंटी बडगे, सुनील अग्रवाल, राहुल बर्वे, किशोर जाधव आदी उपस्थित होते.

