
विशाल मोहिते/ सोलापूर जि.प्रतिनिधी…. इंदापूरच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकीचा धुरळा नसतानाही राजकारण चांगलेच तापू लागले आहे. लोकसभा, विधानसभा, सहकारी साखर कारखाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडूनही राजकीय वातावरण शांत होण्याऐवजी नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही चर्चा निवडणुकीतील उमेदवारी किंवा पॅनलपेक्षा ‘कार्यकर्त्याच्या अडचणीला कोण धावून जातं?’ याभोवती फिरताना दिसत आहे.
इंदापूरच्या गावागावांत, चौकाचौकांत आणि राजकीय कट्ट्यांवर सध्या एक वाक्य वारंवार ऐकायला मिळत असल्याची चर्चा आहे—“नडला-आडला, त्याच्यासाठी आपला प्रदीपदादा अन् प्रवीणभैया!” या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना आश्वासने, विकासाची स्वप्ने आणि कार्यकर्त्यांना मोठमोठी आश्वासने दिली जातात. अनेक ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जाते. मात्र निवडणूक संपल्यानंतर सामान्य नागरिक, शेतकरी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोण उपलब्ध राहते, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
इंदापूर तालुक्यात पाणी, वीज, रस्ते, शेती, कृषी विभागातील कामे, पंचायत समितीच्या योजना, तहसील कार्यालयातील प्रश्न, पोलिसांशी संबंधित अडचणी अशा विविध विषयांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशावेळी राजकीय पाठबळ मिळावे, आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचावे आणि रखडलेले काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्याची असते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर आणि युवा नेते प्रवीण माने यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वाढता संपर्क असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
प्रवीण माने यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून आरोग्य व बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळल्याने प्रशासनाशी कामकाज करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे विविध शासकीय प्रश्नांसाठी संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्री तसेच सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. विविध राजकीय व सामाजिक संपर्कांच्या माध्यमातून प्रश्न मांडून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे तळागाळातील कार्यकर्ते, विविध समाजघटक आणि पक्षातील पदाधिकारी आपली अडचण घेऊन थेट पोहोचत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रश्नासाठी कार्यकर्त्याला आधार देणे, त्याची अडचण समजून घेणे आणि संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करणे, यामुळे त्यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये वेगळी भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, ‘पद कोणते आहे?’ यापेक्षा ‘प्रश्न कोण सोडवतो?’ हा निकष आता कार्यकर्त्यांच्या चर्चेत महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसते.
सध्या इंदापुरात ह्या दोन्ही नेत्यांना सहज भेटावं आणि काम करून घ्यावं अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.पोटात एक ओठांत आणि पाठीवरती वेगळीच थाप अशी काही राजकीय पद्धत ही दोघं अवलंबत नसल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता यांची ओढ सध्या या दोन नेत्याकडे असल्याचे चित्र समोर येत आहे.
राजकारणात पक्षनिष्ठा, गटबाजी आणि निवडणूक समीकरणांना मोठे महत्त्व असते. मात्र सामान्य कार्यकर्त्याला अडचणीच्या वेळी आपल्यामागे कोण उभे राहते, यावरही त्याची राजकीय निष्ठा ठरते. त्यामुळेच सध्या इंदापूरमध्ये राजकीय समीकरणांपेक्षा ‘कार्यकर्त्याचा नेता कोण?’ या प्रश्नाची चर्चा अधिक रंगताना दिसत आहे. लोकांनी नेत्यांवर, कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्या त्या स्थानिक पातळीवरच्या पॅनलला ,कार्यकर्त्यांना उमेदवाराला निवडून दिले पण लोकांना उमेद होते की, आपल्या गावातील, वाड्यावस्त्यांवरील, शहरातील विविध समाजासाठी हे निवडून आलेले उमेदवार जीवाचं रान करून समस्या सोडवतील व सध्या वेगळेच घडत आहे.ज्यांनी ज्यांनी भरमसाठ खर्च निवडणूक येण्यासाठी केला आहे ते निवडून आलेले सध्या विकास कामाचे टेंडर आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, आम्ही जनतेची सेवा करतोय ,आम्हाला जनतेचा खूप कळवळा आहे, असा कळवळा दाखवून, आव दाखवून टेंडर मिळवून गेलेला खर्च दुपटीने ,तिपटीने निष्कृष्ट कामे करून ओरबडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
इंदापूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न असेल ,विजेचा प्रश्न असेल ,खराब रस्त्याचा प्रश्न असेल, कृषी विभागाचा प्रश्न असेल, पंचायत समितीत विविध योजना असतील त्यामध्ये तर इंदापूर तालुक्यात भरमसाठ भ्रष्टाचाराचा कळस झाला असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये गुरांचा ‘गायगोटा’ असेल, रोजगार हमीचे विहिरी असतील,हर घर जीवन मिशन या योजनेचा इंदापुर तालुक्यातील गावोगावी भरमसाठ भ्रष्टाचार झाला असून जर जातीनिहाय चौकशी केली तर मुख्य ठेकेदार, उप ठेकेदार, अधिकारी जेलमध्ये चक्की फिशिंग ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ पुढार्यांचे वाक्यच खरं ठरले !
प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत असून, तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन यांसह विविध शासकीय कार्यालयांतील प्रश्नांवर पाठपुरावा केला जात असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे आगामी काळात या संपर्काच्या राजकारणाचा प्रभाव इंदापूरच्या राजकीय समीकरणांवर कितपत पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या कोणतीही मोठी निवडणूक समोर नसताना कार्यकर्त्यांची वाढती ये-जा, नव्या संघटनात्मक हालचाली आणि नेतृत्वाच्या उपलब्धतेभोवती सुरू झालेली चर्चा भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत तर देत नाही ना, असा सवालही राजकीय जाणकार उपस्थित करत आहेत. निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणारे अनेक; पण अडचणीच्या वेळी फोन उचलणारे आणि प्रश्न घेऊन धावणारे किती? या प्रश्नाचे उत्तरच कदाचित इंदापूरच्या आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवू शकते. तूर्तास इंदापूरच्या राजकीय कट्ट्यावर एकच चर्चा—“नडला-आडला, त्याच्यासाठी आपला प्रदीपदादा अन् प्रवीणभैया !”

