
भोर-चंद्रकांत जाधव… गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भोर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार भोर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील मुख्य प्रवेशद्वारांवर आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी मोहीम राबवण्यात येत असल्याचे भोरचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनांची डिक्की, कागदपत्रे आणि वाहनातील साहित्याची पोलीसांकडून बारकाईने पाहणी केली जात आहे. विशेषतः बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर पोलिसांचा विशेष लक्ष आहे. गणेशोत्सव काळात अवैध दारू वाहतूक, हत्यारे किंवा इतर आक्षेपार्ह वस्तूंची तस्करी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
यावेळी वाहनधारकांना मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहनामध्ये आवश्यक कागदपत्रे ठेवावीत आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन भोर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
भोर शहर आणि ग्रामीण भागात गणेश मंडळांच्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी भोर पोलीस सज्ज आहेत. भोरच्या प्रवेशद्वाराजवळ नाकाबंदी करत मागील महिन्यातच बाहेरील जिल्ह्यातील पाच सराईत दरोडेखोर पकडले होते. त्याच अनुषंगाने सणासुदीच्या गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. यावेळी भोरचे पोलीस निरीक्षक निलेश माने, गोपनीय विभागाचे पोलीस अभय बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल धर्मवीर खांडे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल मोरे, कॉन्स्टेबल हेमंत भिलारे ,वाहतूक विभागाचे पोलीस दत्तात्रय जाधव, होमगार्ड राहुल रोमण व इतर होमगार्ड जवान उपस्थित होते

