
विज्ञानाधारित गणेशोत्सवातून अंतराळविश्वाची सफर
पुणे : सदाशिव पेठेतील श्री शिवाजी मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या १०३ व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चंद्रयान थ्रीडी शो आणि तारांगण शोला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक गणेशोत्सवाला विज्ञान, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मंडळाने साकारलेल्या या उपक्रमाला दररोज हजारो विद्यार्थी, पालक व नागरिक भेट देत आहेत.

चंद्रयान मोहिमेचे थ्रीडी सादरीकरण, तारांगण शो, सूर्यमाला, ग्रह-तारे आणि अंतराळविश्वाची माहिती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच अंतराळवीरांच्या पोशाखातील विद्यार्थ्यांचा सहभाग हे या देखाव्याचे विशेष आकर्षण ठरत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा विज्ञानाधारित गणेशोत्सव साकारण्यात आला आहे. या संकल्पनेची मांडणी हेंकेल इंडिया चे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रसाद खंडागळे आणि ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमीचे संचालक विशाल कुंभारे यांनी केली आहे. हेन्केल तर्फे पुणे जिल्हय़ात 15 ॲस्ट्रॉनॉमी लॅब प्रत्येक तालुक्यात काढली असून 20 हजार मुलांपर्यंत हे ज्ञान पोहोचले आहे. तर फिरत्या तारांगण मुळे अनेक ठिकाणी हे नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाजी मंदिर गणेशोत्सव मंडळाची सामाजिक व विधायक उपक्रमांची परंपरा असून, याच परंपरेला पुढे नेत यंदा विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित गणेशोत्सव साकारण्यात आला आहे.

यावर्षीच्या गणेशोत्सवाचे कामकाज अध्यक्ष श्री. अमृत भडके, विश्वस्त श्री. राजेंद्र शितोळे, श्री. कुंदन कुमार साठे, श्री. संजय मते, उत्सव प्रमुख श्री. तेजस बेंद्रे, उपाध्यक्ष सौ. सुचित्रा बडगुजर, खजिनदार श्री. सचिन रासकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते पाहत आहेत. “आकाशाकडे पाहा, प्रश्न विचारा आणि विज्ञान समजून घ्या” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

