
भोर-चंद्रकांत जाधव.. शहर व तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असताना, भोर पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १३ जणांना तडीपार करण्यात आल्याची माहिती समोर येत असली, तरी संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, १३ जणांवर तडीपारीची कारवाई झाल्याचे सांगितले जात असताना नेमके कोणाला तडीपार केले, याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याने या कारवाईची पारदर्शकता आणि परिणामकारकता याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. तडीपारीची कारवाई कोणत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली, संबंधित व्यक्तींवर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यांना कोणत्या कालावधीसाठी व कोणत्या हद्दीतून तडीपार करण्यात आले, याची माहिती पोलिसांनी स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा दावा आणि दुसरीकडे कारवाई झालेल्या व्यक्तींची नावेच जाहीर न होणे, यामुळे भोर पोलीस ठाण्याचा हा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका मांडते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

