इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे धावत्या सिमेंट टँकरला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला हा टँकर आगीच्या विळख्यात सापडताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले.
ट्रॅक्टरवरील ब्लोअर आणि उपलब्ध अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. स्थानिकांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना परिसरातून व्यक्त केली जात आहे.

